पेण नपाच्या सभेमध्ये शेकापचे नगरसेवक झाले आक्रमक
। पेण । वार्ताहर ।
पेण नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक आक्रमक होऊन सत्ताधार्यांना फैलावर पकडत अनेक प्रश्नांवर सत्ताधारी व अधिकारी वर्गाची बोलती बंद केली.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शोमेर पेणकर यांनी नगराध्यक्षांना विचारणा केली की, आतापर्यत चार बांधकाम सभापती झाले. आज पर्यत 25-25 हजार रुपयांची 24 कामे सुचवली. मात्र त्यातील एकही काम आजतागायत झाले नाही. याचाच अर्थ सत्ताधारी सुढबुध्दिने वागतात. आ.धैर्यशिल पाटील यांनी दिलेल्या विकास निधी अंतर्गत महाडीक वाडी विभागासाठी स्मशानभूमीचे काम गेली दोन वर्ष व्हावे म्हणून मी पाठपुरावा करत आहे. परंतु आ.धैर्यशिल पाटलांचा नाव लागेल म्हणून या संकूचित बुध्दिने काम अडवले जात आहे.
तसेच गेली पाच वर्षात महाडीक वाडी रस्त्यांची कामे झाली नाहीत. गेली 30 वर्ष मी या विभागाची लोकप्रतिनिधी असल्याने मुद्दामहून माझ्या प्रभागाला सोयीसुविधांपासून वंचीत ठेवल जात असून विकास कामे केली जात नाहीत. रामवाडी विभाग पेण शहरात आहे की नाही. याबाबत माझ्या मनात शंकाच आहे. आपले मत मांडत असताना वसुधा पाटील यांचा आवाज वाढला असता नगराध्यक्षांनी त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षा आणि विरोधी पक्ष नेत्या यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. तसेच भाजी विक्रेत्यांना दिलेल्या नोटीस वरून शोमेर पेणकर, संतोष पाटील, राजेंद्र वारकर यांनी नगराध्यक्षांना विचारणा केली की, गेल्या मिटींगमध्ये विषय झाले असताना पुन्हा चुकीच्या पध्दतीने भाजी विक्रेते गाळेधारकांना नोटीस का गेल्या? त्यावर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अनिरूध्द पाटील यांनी देखील अधिकारी वर्गाला खडेबोल सुनवत अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधींना जनते समोर बदनाम करत आहेत असा आरोप केला. तसच संतोष पाटील यांनी मागच्या सभेमध्ये काय झाले होते याचा पाढा वाचुन दाखविला. एकंदरीत अधिकारी वर्ग सत्ताधार्यांना देखील जुमानत नाहीत हेच यावरून सिध्द झाले.
भाजी मार्केटला डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मार्केट इमारतीला महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांचे नाव देण्याचे सभागृहाने एकमुखी ठरवले असून यावेळी नगराध्यक्षांनी नाव देण्याच्या दृष्टीने पुढील कागदोपत्री पुर्तता सुरू असल्याचे सांगितले.
सत्ताधिकारी पक्षाचे नगरसेवक होते गैरहजर
सत्ताधिकारी पक्षाचे नगरसेवक सभापती आजच्या सर्वसाधारण बैठकीला मोठ्या प्रमाणात गैरहजर होते. ज्या वेळेला सर्व साधारण सभेच्या कार्यक्रम पत्रीकेवर ठेकेदार नेमणूक अथवा कामांचे वाटप असेल त्या वेळेला सर्व सभासद आर्वजुन हजर असतात. परंतु आज भाजी मार्केट संदर्भात दोन महत्वाचे मुद्दे कार्यक्रम पत्रिकेवर असताना सत्ताधारी नगरसेवक गैरहजर होते.