काळे कृषी कायदे रद्द करा, तरच आंदोलन मागे

मोदी सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक; राहुल गांधींच्या नेतृत्वात घेतली शेतकर्‍यांची भेट
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी कित्येक दिवस जंतरमंतरवर ठिय्या मांडून बसले आहेत. मोदी सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले असून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 14 भाजप विरोधी पक्षांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर जाऊन शेतकर्‍यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. चर्चा हवीच कशाला? काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.

आमचा शेतकर्‍यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या न्याय आहेत. त्यामुळेच आम्ही जंतरमंतरवर आलो आहोत. विरोधी पक्षाचे सर्वच नेते शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. आता चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही, असं राहुल यांनी सांगितलं.

जंतरमंतरवर आलेल्या या खासदारांनी शेतकर्‍यांची विचारपूस केली. यावेळी या खासदारांनी शेतकरी वाचवा, देश वाचवाचे नारेही दिले. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. संसदेत कृषी कायदे आणि पेगॅससच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरुच आहे. विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेचं कामकाज ठप्प आहे. 19 जुलैला संसदेचं कामकाज सुरु झालं होतं. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कामकाज ठप्प आहे.

आम्ही आज शेतकर्‍यांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत. सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील. त्यानंतरच हे आंदोलन संपेल.

राहुल गांधी, काँग्रेस नेते

Exit mobile version