बेकायदेशीर मदरशाला विरोध

बांधकाम त्वरित थांबविण्याची मागणी, दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता

| महाड । प्रतिनिधी |

महाड शहरातील कोटआळी परिसरात एका खासगी जागेमध्ये अनधिकृत मदरसा बांधकाम होत असल्याची माहिती समोर आली. कोणत्याही स्वरूपाची प्रशासकीय परवानगी न घेता मदरशाचे बांधकाम सुरू असून ते त्वरित थांबवण्यात यावे, तसेच झालेले बांधकाम तोडण्यात यावे, अशी मागणी महाडकर नागरिकांनी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.


याबाबत अधिक अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार महाडची ग्रामदेवता श्री जाकमता देवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका खासगी जागेत मुस्लिम मेमन समुदायाच्या ट्रस्टतर्फे हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. यामध्ये मदरसा आणि मशिद बांधली जाणार असल्याची चर्चा या परिसरातील आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये करण्यात येत होती. सदरची चर्चा गेल्या काही दिवसापासून महाड शहरात सुरू झाली. सदरची बातमी पसरताच महाड शहरातील हिंदू बहुजन समाज एकत्र येऊन त्यांनी हा प्रकार हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.

नगरपरिषदेमार्फत हे बांधकाम थांबवण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे समजते त्याचप्रमाणे बुधवार (दि.15) रोजी श्री जाकमातादेवी मंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत महाडच्या प्रांताधिकरी प्रतिमा पुदलवाड यांना एक लेखी निवेदन सादर करून यामध्ये महाडची ग्रामदेवता श्री जाकमाता देवी मंदिर हे ऐतिहासिक असून याला अनेक वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी विविध उत्सव आणि दररोज महाआरती होत असते. अशा पवित्र ठिकाणी जर बाजूला मदरसा आणि मशिदीला परवानगी मिळाली तर भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे हे बांधकाम त्वरित पाडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महाडमधील बहुसंख्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महिला भगिनी व महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version