| महाड | प्रतिनिधी |
महाड म्हाप्रळ रस्त्यावर दादली ते शिरगाव या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास चार भव्य गतिरोधक टाकल्याने गेली काही दिवस दुचाकी स्वारांच्या अपघातात वाढ झाली आहे. अवघ्या एक किमी अंतरावर चार गतिरोधक टाकून गतिरोधक नियमांची सार्वजनिक बांधकाम विभागानेच खिल्ली उडवली आहे.
सध्या महाड तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तालुक्यातील म्हाप्रळ पंढरपूर तसेच महाड अंबडवे या दोन मार्गांना जोडणार्या महाड दादली शिरगाव या मार्गाचे देखील रुंदीकरण झालेले आहे यामुळे वाहन वेग वाढला आहे. वाहने सुरक्षित दृष्ट्या आणि वेगाने चालवता यावीत याकरिता रस्ते सुस्थितीत केले असले तरी स्थानिक ग्रामस्थांनी मात्र आपल्या घरासमोर गतिरोधक टाकले जावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
ग्रामस्थांच्या या मागणीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आणि अवघ्या एक किमी अंतरावर चार गतिरोधक टाकले आहेत. अचानक टाकलेल्या या गतिरोधकांमुळे नेहमी या मार्गाने जाणार्या दुचाकी स्वारांना अपघातास सामोरे जावे लागले आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी नियमानुसार गतिरोधक टाकण्यात यावेत अशी मागणी जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार, उदय सावंत यांनी केली आहे.