उल्हासनगर येथील चार प्रवासी बचावले
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांची गाडी रस्त्याच्या खाली जाऊन अपघात झाला. या अपघातात वाहनचालक आणि अन्य तिघे असे चार प्रवासी थोडक्यात बचावले असून, गाडी झाडाला जाऊन धडकल्याने हा अपघात थोडक्यात निभावला आहे.
उल्हासनगर येथील कुटुंब आपली ओरा ही गाडी घेऊन माथेरान येथे पर्यटनस्थळी आले होते. दिवसभर माथेरान मध्ये पर्यटनाचा आणि धुकेमय पावसाचा आनंद घेऊन सायंकाळी आपल्या घरी परतण्यासाठी माथेरान येथून निघाले. माथेरान हा अवघड घाट त्या कुटुंबातील एक सदस्य आपली गाडी चालवत प्रवास करीत होते. त्यावेळी जुमापट्टीचे अलीकडे असलेली एस टर्न येथे त्यांची गाडी रस्त्याच्या खाली गेली. त्यावेळी येथील सिमेंट कठडे तोडून ही गाडी पलीकडील झाडावर जाऊ आदळली. या अपघातात ते वाहन जर झाडाला अडकण्याऐवजी खाली गेले असतेतर मोठी जीवितहानी झाली असती. त्या गाडी मधून चार प्रवासी प्रवास करीत होते आणि त्या सर्वांचे प्राण त्या एका झाडाने वाचवले आहेत. या अपघातात गाडीला मोठे नुकसान झाले असून, नेरळ पोलीस काही वेळातच अपघातस्थळी पोहचले आणि त्यामुळे जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्याची मदत पुरवली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, नेरळ- माथेरान घाटात सध्या सुरू असलेल्या पर्यटन हंगामात दररोज किरकोळ अपघात होत आहेत.






