| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यातील चार गावांतील ग्रामस्थांची जमीन वाढीव औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाड एमआयडीसीकडून जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले.
महाड तालुक्यात एमआयडीसी परिसरातील जिते, धामणे, शेलटोली व सवाणे या चार गावांतील एमआयडीसीच्या वाढीव भूसंपादनाकरिता सुमारे 325 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. 2017 पासून एमआयडीसीकडून जमीन संपादनासाठी प्रयत्न केले जात आहे. 2017 मध्येही ग्रामस्थांनी अशाच प्रकारे घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर पुन्हा या प्रक्रियेने डोके वर काढले आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच ग्रामस्थांनी विरोध स्पष्ट करत 15 सप्टेंबरला महाड प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांना लेखी निवेदन सादर केले होते. तरीही प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता जमीन मोजणीची नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यात आली.
एमआयडीसीकडून गावांत वाढीव भूसंपादनासाठी मोजणीची तयारी सुरू असतानाच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेत तीव्र विरोध दर्शविला. कोणत्याही स्थितीत आम्हाला नवीन एमआयडीसी नको, वाढीव भूसंपादनाला आमचा तीव्र विरोध असून सध्या अस्तित्वात असलेल्या एमआयडीसीतील कारखान्यांत सुधारणा करून दर्जेदार सुविधा व रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच, बंद पडलेले कारखाने व त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन तेथे स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने धनंजय देशमुख यांनी या वेळी केली. प्रशासनाने जबरदस्ती करून मोजणी प्रक्रियेचा अवलंब केला तर आम्ही कोणत्याही स्तरावर जाऊन प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश शितोळे यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मारुती आंधळे हे देखील उपस्थित होते.
असे होणार भूसंपादन धामणेः 177 हेक्टरः 593 शेतकरी शेलटोलीः 55.50 हेक्टरः 192 शेतकरी जीतेः 57.50 हेक्टरः 124 शेतकरी सवाणेः 35 हेक्टरः 142 शेतकरी
ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध असल्याने आम्ही तूर्तास मोजणी प्रक्रिया थांबवली आहे. ग्रामस्थांशी पुन्हा सविस्तर चर्चा करणार आहे. तसेच प्रत्येकाकडून वैयक्तिक निवेदन घेण्यात येईल.
महेश शितोळे,
तहसीलदार, महाड