जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चा
पेण | संतोष पाटील |
रायगड जिल्ह्यात शासनाला हाताशी धरून हे उदयोजक रायगडातील जमिनी कवडी मोल भावाने घेउन आपला उदयोग धंद्याचा विस्तार वाढवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे शासनाला हाताशी धरून रायगड जिल्हयात विविध प्रकल्पांसाठी चाललेल्या सक्तीच्या जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी मोठया संख्येने शेतकरी 16 डिसेंबर 2021 रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडकणार आहेत.
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू व विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी तसेच रोहा मुरूड तालुक्यात बल्क ड्रग्ज फार्मापार्कसाठी माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातही शेतकर्यांच्या जमीनी सक्तीने संपादित केल्या जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी सदर मोर्चा सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे शासन एकीकडे शेतकर्याला बळीराजा म्हणतोय परंतु त्याच बळीराजाला चिरडून भूमीहिन करून धनदांडग्यांच्या घशात बळीराज्याचा सोन्याचा तुकडा बळजबरीने हिसकावून घेऊ पाहत आहेत. परंतु शेतकरी राजा एकवटला तर भल्या भल्यांना पाणी पाजल्या शिवाय राहत नाही. हा रायगडचा इतिहास आहे. हयाचीच आठवण करून देण्यासाठी व शासनाची चाललेली सक्ती झुगारून देण्यसाठी बळीराजा मोठया संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.
या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी व विधीमंडळ सदस्यांना करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधाची सविस्तर कारणे देणारी प्रकल्पनिहाय निवेदने यापूर्वीच शासनाकडे पाठवली असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सांगीतले. या मोर्चा मध्ये विधी मंडळातील ज्येष्ठ आमदार, शे.का.प चे सरचिटणीस जयंत पाटील, धैर्यशिल पाटील, आ.रवीशेठ पाटील, समाजसेविका उल्का महाजन, सुरेखा दळवी, वैशाली पाटील, यांच्यासह 11 गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी, एम.आय.डी.सी. प्रकल्प बांधित असणर्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाळगंगा प्रकल्प बांधित 24 गाव जमीन बचाव समिती. सेझ विरूध्द समिती अशा अनेक सामाजिक संघटना देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे संयोजक के जी म्हात्रे, लक्ष्मण कोठेकर , उपसरपंच, विजय पाटील माजी सरपंच, गजानन पेढवी , सदानंद ठाकूर, प्रभाकर पाटील, महेंद्र पाटील आदी मंडळी आहेत.मोर्चासाठी परिसरात बॅनरबाजीही करण्यात आली आहे.शिवाय 11 गावात जनजागृती केली जात आहे.
तर महामार्ग बंद करणार
शासनाने येत्या 15 दिवसात डोलवी एमआयडीसी रद् केला नाही,तसेच आम्ही केलेल्या मागण्यांचा विचार केला नाही तर मुंबई -गोवा महामार्ग बंद करण्याचा इशारा 11 गाव बचाव संघर्ष समितीच्यावतीने शासनाला देत आहोत,असे संघर्ष समितीचे समन्वयक के.जी.म्हात्रे यांनी जाहीर केले.
