पठाणी करवसुलीला विरोध: महापालिकेविरोधात शेकाप आक्रमक

अधिकार्‍यांना विचारला जाब
| पनवेल । वार्ताहर ।
उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली महापालिकेविरुद्धची याचिका फेटाळली तर मालमत्तेची जप्ती करण्यात येईल अशा प्रकारचे धाक दाखवून खांदा वसाहतीमध्ये कर धारकांकडून बेकायदेशीरपणे सुरु असलेली कर वसुली बाबत शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाले असून, याबाबत महापालिका अधिकार्‍यांना जाब विचारात अशा प्रकारे पठाणी कर वसुलीचा तीव्र निषेध करण्यात आला.

खांदा कॉलनीमध्ये मालमत्ता करधारकांना प्रत्यक्ष भेटून याचिका फेटाळली, जप्ती येईल अशा प्रकारे धाक दाखवून करधारकांकडून बेकायदेशीरपणे पनवेल महापालिकाची कर वसुली सुरू आहे. याबाबत करधारकांनी याचिकाकर्ते तथा शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे तसेच खांदा कॉलनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के व उप शहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर यांनी फोन करून माहिती दिली असता त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यावर लेखनिक गणेश पाटील व त्यांच्या सोबत दोन कर्मचारी महिला व पुरुष सेक्युरिटी गार्ड आणि एक कॅमेरामन असा सहा जणांचा फौजफाटा घेऊन महापालिकाकडून करधारकाना धमकावून कर वसुली होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच महादेव वाघमारे यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशी पठाणी कर वसुली करणे हे अन्यायकारक असून महापालिका अधिकार्‍यांना याबाबतचा जाब विचारत महापालिकेचा शेकाप व शिवसेना कडून तीव्र निषेध करण्यात आला. त्यांनतर आलेल्या अधिकार्‍यांनी काढता पाय घेतला. अशा प्रकारे धाक दाखवून महापालिकेच्या अधिकार्‍यांनी कर वसुलीसाठी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव वाघमारे यांनी केले. यावेळी याचिकाकर्ते तथा शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, सदानंद शिर्के, दत्तात्रेय महामुलकर, प्रकाश वानखेडे, धाडवे, तानाजी घारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version