। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) गावाच्या हद्दीत होऊ घातलेल्या येथील रिलायन्स कंपनीच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला कडसूरे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून,जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या प्रकल्पाला अनुमती न देण्याचा ठराव गावबैठकीत करण्यात आला.
या संदर्भात रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर कडसुरे गाव कमिटीच्या झालेल्या दोन बैठकांमध्ये नोकरी व रोजगाराच्या प्रमुख मागणीसह इतर कोणत्याही बाबतीत समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता रिलायन्सच्या या सौरऊर्जा प्रकल्पा विरोधात राष्ट्रीय हरित लवाद पुणे, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत व तक्रार दाखल करण्यासंदर्भात ठराव कडसुरे ग्रामस्थांच्या 20 फेब्रुवारीला सायंकाळी झालेल्या गावबैठकीत एकमुखाने घेण्यात आला. याचबरोबर याप्रकरणी रिलायन्स विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
कडसुरे येथील श्री हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या या गावबैठकीला कडसुरे ग्रामस्थ पकल्प गावकमिटीतील अरुणभाऊ शिर्के, दिलीप शिंदे, महेश शिंदे, दत्तात्रेय शिर्के, रमेश शिर्के, रविंद्र शिर्के, तेजस शिर्के आदींसह यशवंत शिर्के, धाकू शिर्के, कृष्णकांत शिर्के, नथुराम पाटेकर, समाधान शिंदे, पोलीस पाटील विठ्ठल शिंदे तसेच ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.