| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या काठी खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असल्याने या दुकानांना पनवेलकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला विरोध करायला सुरुवात केली आहे. वडाळे तलाव ही निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. पनवेलकर नागरिकांना या वडाळे तलावाचा अभिमान आहे.अलीकडच्या काळात महानगरपालिकेने वडाळे तलावाच्याकाठी बांधकाम करून तलावाचे व तलाव परिसराचे सुशोभीकरण केले आहे.
या सुशोभीकरण कामात अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे वडाळे तलाव व तलावाचा परिसर हा नागरिकांसाठी सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरण्यासाठी, मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी, तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. वडाळे तलाव व तलावाचा सर्व परिसर अधिकाधिक नैसर्गिक, शांत व रम्य कसा होईल याकडे महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे. त्याच प्रांगणात तसेच तलावाच्या काठी इतरत्र खाद्य वस्तूंची व इतर वस्तुंची दुकाने थाटण्यात येणार आहेत. अशी दुकाने येथे सुरू केल्यास तलावाच्या काठी बकालपणा वाढेल. तलावाचा परिसर मोकळेपणाने निवांत फिरण्यासाठी उपलब्ध असला पाहिजे असे पनवेलकरांचे म्हणणे आहे. तरी दुकाने, व्यापार, वस्तु विक्री करणार्या हातगाड्या वगैरसाठी वडाळे तलावाचा परिसर वापरू देऊ नये अशी पनवेलकरांना मागणी केली आहे.