| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
थायलंडच्या आखातातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी (दि.4) एका जहाजाला भीषण आग लागली. या भीषण आगीपासून बचाव करण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी थेट समुद्रात उड्या मारायला सुरूवात केली. पण या अपघातातून जहाजावरील सर्व 108 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
हे जहाज सुरत थानी प्रांतातून थाई किनाऱ्यावरील लोकप्रिय पर्यटन स्थळ कोह ताओला जात होती. तेवढ्यात जहाजातील एक प्रवासी मैत्री प्रॉमजम्पा यांना अचानक मोठा आवाज आणि धुराचा वास आला. तेव्हा त्याच्यासह इतर प्रवाशांनी आरडाओरडा करत अलार्म वाजवला.
सूरत थानी प्रांताच्या सरकारच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, 108 जणांपैकी या जहाजात बसलेले 97 जण सूरत थानीचे होते. या अपघातातून सर्वांना वाचवण्यात आले असून, कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जहाजाच्या इंजिनमधून आग लागली असून आगीमागचे कारण तपासले जात आहे.