शेकापच्या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद
। रायगड | जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शेतकरी कामगार पक्षाने पुकारलेल्या आंदोलनाला आता सोशल मीडियावरूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्मार्ट मीटरला विरोध दर्शवत शेकापच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून, नागरिकांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सोशल मीडियातून केले जात आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवानंतर या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी स्मार्ट मीटरविरोधात भूमिका घेतली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध असतानाही महावितरणकडून मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन आणि स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण माहिती देऊनच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे. दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत असल्याच्या तक्रारींचाही शेकापने मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी महावितरण कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणे, घेराव घालणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे, अशा माध्यमातून पक्षाने आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
“स्मार्ट मीटरची सक्ती सहन केली जाणार नाही. हा केवळ राजकीय लढा नसून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा प्रश्न आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन हा लढा उभारला जाईल,” असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.
अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाला सोशल मीडियावरूनही व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.
संस्थेमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, महावितरण विभागाने त्यांच्या नियमात बदल केले. त्यामुळे वीज बिल दुपटीसह तिपटीने येऊ लागले. सौर ऊर्जा प्रणालीमुळे वीज जास्त तयार होऊनही बिल भरावे लागले. बिलाचे पैसे शिल्लक असतानाही ज्यादा युनिटचे पैसे मागण्यात आले. स्मार्ट मीटर लावल्याने बिल अधिक वाढत आहे. त्यात नागरिकांचा ही स्मार्ट मीटरबाबत गोंगाट आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर विरोधात सोशल मिडीयावर पोस्ट टाकली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचे जयंत पाटील यांनी देखील चांगला मुद्दा घेतला आहे. आगामी काळात स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलाबाबत वकीलांसोबत चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सुरेश पाटील, संस्थापक अध्यक्ष
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग






