माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजीराजे आंग्रे यांनी केला निषेध
| रायगड । खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असतानाच आता अलिबागच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, अलिबागचे नाव मायनाक नगरी करण्याला अलिबागकरांनीच प्रखर विरोध केला आहे. समाजमाध्यमांवर नामांतराबाबत जोरदार मोहिम सुरु झाली आहे. अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वशंज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह अनेकांनी या मागणीला विरोध केला आहे. तसेच, विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी यामध्ये नाक खुपसू नये, असा इशारा देत त्यांच्या मागणीचा कडक शब्दात निषेध केला आहे.
अलिबागचे नाव बदलून ते मायनाक नगरी करावे, अशी मागणी करणारे पत्र अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. नार्वेकरांनी मागचा-पुढचा कोणताच विचार न करता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करावे, अशी मागणी केली आहे.
अलिबाग या नावाला इतिहास आहे. या भूमीत कान्होजी राजे आंग्रे यांचे फार मोलाचे योगदान आहे. येथील सर्व जाती-धर्माचे नागरिक एकोप्याने राहत आले आहेत. उगाचच कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. काही वर्षापूर्वी स्वर्गीय अॅड.नमिता नाईक यांनी अलिबाग अस्मिता अभियान राबवले होते. याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली होती. तसेच, मायनाक भंडारी यांच्या स्मारकासाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी.
प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष, अलिबाग
निवडणूक काळात अशी मागणी करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नार्वेकर यांनी करू नये. ऐतिहासिक अलिबाग नगरी उभारणीत, जडण घडणीत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे योगदान एकमेव द्वितीय आहे. हे कोणीच नाकारु शकत नाही. अलिबागचे नाव हे ऐतिहासिक नाव आहे. या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे. कान्होजी आंग्रेच्या कालखंडापासून ते आजवर नगरीने अनेक नवरत्न महाराष्ट्राला तसेच देशाला दिले आहेत. शहराचे नाव हे अलिबागच राहिले पाहिजे. जर बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार झाला पाहिजे. याबाबत राहुल नार्वेकरांनी दूर राहावे.
रघुजी राजे आंग्रे
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा अलिबाग तालुका जगाच्या नकाशावर प्रसिद्धीस आलेला तालुका आहे. निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग तालुक्याचे नाव मायनाक भंडारी करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणारे राहुल नार्वेकर विधानसभेचे सभापती असले तरी त्यांचे अलिबाग तालुक्यातील विकासामध्ये योगदान शून्य आहे. केवळ चोंढी परिसरातील एका हॉटेलच्या माध्यमातून त्यांचा अलिबाग बरोबरसंबंध आला. कनकेश्वर फाटा परिसरात मिळकती विकत घेऊन त्या विकसित करण्याचा त्यांचा व्यवसाय असावा. त्यांनी अलिबाग तालुक्याचे नामांतर करण्यासाठीची शक्कल लढवू नये. अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरात दत्ताजी खानविलकर यांच्या कारकिर्दीत 1978 साली क्षेत्र विकास योजना राबविण्यात येऊन त्या योजनेला श्रीबाग असे नाव देण्यात आले आहे. यामुळे अलिबाग तालुक्याचे नाव बदलण्यासाठीचे राजकारण करू नये अन्यथा सर्वच राजकीय पक्ष या मागणी विरोधात उतरतील.
अमर वार्डे, माजी नगरसेवक, अलिबाग