भाजपच्या विरोधात विरोधकांची एकजूट साधणार; नितीशकुमारांचा निर्धार

। पाटणा । वृत्तसंस्था ।
पंतप्रधानपद मिळवण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, केंद्रातील सत्तारूढ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आपण सकारात्मक भूमिका निभावू, असा निर्धार नितीशकुमार यांनी व्यक्त केला.

बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरुद्ध केंद्र सरकारकडून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आदी सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाचा धाक आपल्याला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीशकुमार म्हणाल की, ज्यांना सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाची सवय लागली आहे, त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावाच लागेल. बिहारवासीयांना एके दिवशी आपण पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहता येईल का, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर नितीशकुमार हात जोडून म्हणाले, की कृपया मला असे प्रश्‍न विचारत जाऊ नका. मला अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मी बिहारची सेवा करू इच्छितो.

नव्या सरकारवर ईडी व सीबीआयची वक्रदृष्टी पडण्याची भीती असल्याबद्दल विचारले गेल्यानंतर नितीशकुमार म्हणाले, की त्याचा कोणताही धाक वाटत नाही. एक लक्षात ठेवा, केंद्रातील सत्ताधार्‍यांना सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करण्याची सवय जरी लागली असली तरी त्यांच्यावर जनतेची तीक्ष्ण नजर असेल, असे ते म्हणाले.

Exit mobile version