। पनवेल । प्रतिनिधी ।
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर असलेल्या चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकार्यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने केली.
यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, रायगड जिल्हा समन्वयक दीपक निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, काँग्रेसचे आर.सी.घरत, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, नगरसेवक गणेश कडू, शिवसेनेचे अतुल पालन, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, पराग मोहिते, राष्ट्रवादीच्या महिला शशिकला सिंग, अमिता चौहान आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.