गढूळ पाण्याने नारंगी ग्रामस्थ रोगराईच्या विळख्यात

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती, अशुद्ध व दूषित पाणी पुरवठ्याने गावकरी आक्रमक
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात औद्योगीकीकरण झपाट्याने वाढत आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्या आजही पाण्यासाठी वणवण भटकंती करतायेत. अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा यामुळे दहागाव छत्तीशी विभागातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडी, बौद्ध वस्ती,देवकुंडाची आदिवासी वाडीतील रहिवाशी, नवीन वसाहतीमधील ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. आम्ही देखील माणसे आहोत, जनावरे नाहीत, आम्हाला शुद्ध पाणी हवे अशी मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व आदिवासी बांधवांना पाणी विकत घेणे परवडत नसल्याने नागरिक संतप्त झालेत.
कायम अनियमित व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने लहान मुले,महिला,वृद्ध ग्रामस्त यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठलेत, खरूज सारखे त्वचा रोग निर्माण झालेत. आम्हाला रोजगार नाही, मुलांना दवाखान्यात जाऊन उपचार करणे परवडत नाही, अशी व्यथा आदिवासी बांधवानी मांडली. अशुद्ध पाणीपुरवठा तसेच खराब रस्ते, अपूर्ण पथदिवे आणि इतर समस्यांबाबत ग्रुपग्रामपंचायत नारंगी चे लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रायगडच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना देण्यात आली. गढूळ पाणी शरीराला हानिकारक असल्याने नारंगी मधील संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून देण्यात आले.
वारंवार विनंती देवाची कुंड आदिवासी वडी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रोज दीड ते दोन किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. त्याच प्रमाणे दलित वस्ती, आदिवासी वाडी आणि नवीन वसाहत यांना पाणी पुरवठा होत असलेल्या नदीचे पाणी ज्या कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे प्रदूषित होते अशा कंपन्यांवर नारंगी ग्रुपग्रामपंचायतीकडून का करण्यात आली नाही याबाबत सदर कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या नदीच्या पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेत गुणवत्ता मोजण्यासाठी पाठवण्यात येऊन चाचणी अहवालात दोष सापडले तर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. यावेळी निनाद गायकवाड, रमेश गायकवाड, वैशाली देशमुख, शुभांगी देशमुख, गुलाब वाघुले, सुप्रिया वाघुले, मंगल वाघमारे, सुवर्णा गायकवाड, प्राजक्ता गायकवाड, उज्ज्वला गायकवाड आणि नारंगी गावचे ग्रामस्थ यांनी स्वच्छ व मुबलक पाणी मिळवून द्यावे, व आम्हाला रोगराई पासून मुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

Exit mobile version