| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.13) अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
मीनाक्षीताई पाटील रायगडच्याच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या झुंजार नेत्या होत्या. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांची कामगिरी मोलाची राहिली आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे, यासाठी शेकापच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 वक्तृत्व स्पर्धा 13 सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी 45 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.
‘स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षीताई पाटील, येवा कोकण आपलोच असा-पण विकासाचं काय?, सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे, नफरत के बाजार मे मोहोब्बत बेच रहा हूं मै, सकारात्मक बदलाची सुरुवात-व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख 11 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख आठ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला रोख पाच हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला रोख तीन हजार रुपये व चषक तसेच पाचव्या क्रमांकाला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये व चषक अशी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.







