गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

खासगी रुग्णालये रडारवर

| रायगड | प्रतिनिधी |

गेल्या तीन वर्षांत राज्यात जन्मजात व्यंग्य हे पहिल्या पाच प्रमुख बालमृत्यूंच्या कारणांपैकी एक म्हणून समोर आले आहे. जन्मजात व्यंगामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी व गर्भातील जन्मजात व्यंग शोधण्यासाठी ॲनॉमली स्कॅन तपासणी आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना याबाबत निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाने 2023-24, 2024-25 आणि 2025-26 (ऑक्टोबर 2025 पर्यंत) राज्यातील बालमृत्यूंचे विश्लेषण केले. याचा बालमृत्यू विश्लेषण व विश्लेषण अहवाल आरोग्य विभागाने तयार केला आहे. त्यानुसार, राज्यात गेल्या तीन वर्षांत जन्मजात व्यंग हे बालमृत्यूच्या पहिल्या पाच प्रमुख बालमृत्यूंच्या कारणांपैकी एक असल्याचे निष्पन्न झाले. राज्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या बालमृत्यूंपैकी सुमारे 6.5 टक्के जन्मजात व्यंगामुळे झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गर्भातील जन्मजात व्यंग तपासण्यासाठी केले जाणारे ॲनॉमली स्कॅन आवश्यक असल्याच्या सूचना केल्या आहेत.

आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, गर्भवतींचे ॲनॉमली स्कॅन 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत करावे. ही तपासणी सर्व सरकारी रुग्णालयात 2024-25 पासून मोफत करण्यास सुरूवात झाली. गर्भवतींचे ॲनॉमली स्कॅन करण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयात आवश्यकतेनुसार सोनोग्राफीची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यातून जन्मजात व्यंग घेऊन जन्माला येणाऱ्या अर्भकांचे प्रमाण कमी झाले. मात्र, राज्यातील एकूण प्रसूती व प्रसूतीपश्चात सेवांपैकी 50 टक्के सेवा खासगी रुग्णालयात दिल्या जातात. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती ॲनॉमली स्कॅनपासून वंचित राहू नयेत, याची खबरदारी खासगी रुग्णालयांनी घ्यावी. सर्व रुग्णालयांनी ही तपासणी करावी. गर्भात जन्मजात व्यंग राहिल्यास गर्भपात करण्यासाठी गर्भवतीचे समुपदेश रुग्णालयाने करावे.

खासगी रुग्णालयातील ॲनॉमली स्कॅनसाठी नियम

सर्व गर्भवतींची 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत तपासणी करावी.

गर्भवती व तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना तपासणीस प्रवृत्त करावे.

ॲनॉमली स्कॅनचा खर्च गर्भवतीच्या कुटुंबीयांकडून घ्यावा.

या तपासणीसाठी सरकारकडून खासगी रुग्णालयांना अनुदान मिळणार नाही.

तपासणी करताना लिंगनिदान नियमांचे उल्लंघन करू नये.

गर्भात व्यंग आढळून आल्यास गर्भपातासाठी समुपदेशन करावे.
ॲनॉमली स्कॅन म्हणजे काय?
ॲनॉमली स्कॅन ही गर्भवतींची नियमित सोनोग्राफी तपासणी असते. ही गरोदरपणाच्या 18 ते 22 व्या आठवड्यात केली जाते. या तपासणीत गर्भातील व्यंग तपासले जाते. त्यात गर्भाची रचना, त्याच्या अवयवांचा विकास आणि एकूण वाढ या बाबी तपासल्या जातात. गर्भाच्या मेंदू, हृदय, हाडे अथवा आणि अवयवांची तपासणीही यात केली जाते.
Exit mobile version