पाच कार्यालयावर स्थलांतराची कुऱ्हाड

राजिपच्या चार कार्यालयांना जागा मिळेना; ट्रॉमा केअर उभारणीचा मुहूर्त लांबला

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‌‘अपडेट’ होत असून महामार्गावरील अपघातग्रस्त रूग्ण उपचार करण्यापासून ते विविध आजारावरील रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाशेजारी ट्रॉमा केअर सेंटर दोन वर्षापूर्वी मंजूर झाले. मात्र गेले अनेक दिवस या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे शासनांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकात नाराजी पसरली आहे.

मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्वाच्या राज्य मार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. मात्र या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसाठी पूर्वीची पंचायत समितीची जागा शासनाने उपजिल्हा रूग्णालयाकडे वर्ग केली. त्यानंतर याठिकाणी पूर्वीपासून असणारी राजिपची चार कार्यालयांना ही जागा खाली करून इतरत्र स्थालांतरित करण्याचे आदेश शासनाने संबंधित कार्यालयांना दिले. मात्र, पावसाळा आला तरी ही कार्यालये पूर्वीच्याच इमारतीत सुरू असल्याने ट्रॉमा केअर सेंटर उभारणीचा मुहूर्त लांबत असला तरी या चार कार्यालयावर स्थलांतराची कुऱ्हाड कायम आहे.

गेली अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गालगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदची महत्वाची व जिव्हाळ्याची असणारी चार कार्यालये गेली अनेक वर्षापासून कामकाज चालवीत आहेत. त्या कार्यालाची जागा उपजिल्हा रूग्णालयाकडे वर्ग करण्यात आली असून याठिकाणी लवकरच ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्याचा माणगाव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आराखडाही आला आहे.

त्यामुळे राजिपच्या या कार्यालयांना दुसरीकडे स्थलांतरिताची कुऱ्हाड डोक्यावर कायम रहाणार आहे. त्यामुळे ही कार्यालये भाड्याच्या खोलीत चालवली जाणार आहेत. माणगाव येथे राजिपच्या इमारतीत यापूर्वी माणगाव पंचायत समितीचे कामकाज चालत होते. माणगाव पंचायत समितीची स्वतंत्र इमारत गेली 17 वर्षापूर्वी माणगाव प्रशासकीय भवनलगत भव्य स्वरुपात शासनाने बांधली. त्याठिकाणी जि.प. च्या विविध विभागाचे काम सुरू आहे.

राजिपच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, विभाग आणि गट शिक्षण अधिकारी यांचेकडील गट साधन केंद्र सर्व शिक्षा अभियान कार्यालय, महिला बालकल्याण विभाग, या चार कार्यालयाच्या विभागांना नवीन पंचायत समिती इमारतीत जागा नसल्याने ही चार महत्वाची कार्यालये अद्याप पर्यत जुन्या पंचायत समिती इमारतीत सुरु आहेत.

या इमारतीलगत माणगाव उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी शासनांनी ट्रॉमा केअर सेंटर दोन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे या चार कार्यालयांना पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या असल्याने त्यांच्यावर स्थालांतराची वेळ आली आहे. ट्रॉमा केअर सेंटरमुळे या चार कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी संबंधित विभागांना शासनाकडून पत्र आल्याने त्यांच्यापुढे दुसरी जागा शोधण्याची वेळ आली आहे.

या कार्यालयांना माणगाव तहसीलदार व माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करून बसण्याची व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्रान्वये कळविले होते. मात्र चारही कार्यालये अद्यापही स्थलांतरित केली नसल्याने माणगावच्या ट्रॉमाकेअर सेंटर उभारणीला विलंब लागणार आहे. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर होवूनही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ट्रॉमा केअर सेंटरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exit mobile version