व्हॅलेंटाईन डेचं अनोखं गिफ्ट; अवयव दान करून प्रिय व्यक्तीचे वाचविले प्राण

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण प्रकरणांची झाली नोंद
| पनवेल | वार्ताहर |

प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी प्रत्येजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. खारघर येथील मेडीकव्हर रूग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रेमदिनी ही एक अनोखी बाब असून आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रियजनांकडून अवयव दान करण्याचे उचललेले धाडसी पाऊल आहे. दात्यांनी घेतलेल्या अतिशय धाडसी कृतीने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या दात्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.

रवींद्रनाथ शेंदरे या 38 वर्षांच्या रूग्णाला हिपॅटायटीस बीचे निदान झाले, वैद्यकीय उपचारानंतरही नोव्हेंबर महिन्यात त्यांचे यकृत निकामी झाले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासणी आणि उपचार करूनही प्रकृतीत कोणतीच सुधारणा नसल्याने यावर प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग होता. अशा परिस्थितीत पत्नी दीपाली शेंदरे यांनी यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. आता दाता आणि प्राप्तकर्ता दोघेही बरे झाले असून, सर्वसामान्य जीवनशैली जगत आहेत. बड चियारी सिंड्रोमचे निदान झालेल्या 38 वर्षीय महेंद्र बोरडे पाटील वेनोप्लास्टी करण्यात आली, मात्र रात्रीतून त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना यकृत प्रत्यारोपण करावे लागले. त्यांचा रक्तगट बी होता आणि त्यांच्या कुटुंबात कोणताही रक्तगट जुळणारा रक्तदाता नव्हता. त्यांची पत्नी रूपाली ही यकृत दान करण्यास इच्छुक होती, परंतु तिचा रक्तगट ए होता. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एबीओ-विसंगत यकृत प्रत्यारोपणासाठी यशस्वीरित्या केले असून, आता तो रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे.

अवयव दानामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिक असून बर्‍याच प्रकरणांमधील दात्यांमध्ये महिलांचा समावेश दिसून येतो, असेही डॉ राऊत यांनी स्पष्ट केले. वरील सर्वच प्रकरणातून खर्‍या प्रेमाची प्रचिती आली असून, आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी स्वतच्या जीवाची बाजी लावून अवयव दान करणे हे केवळ त्या व्यक्तीवरील असलेल्या निःस्वार्थ प्रेमामुळेच शक्य होऊ शकते, असेही डॉ राऊत यांनी स्पष्ट केले. वरील सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या आव्हानात्मक होत्या. परंतु, मेडीकव्हर रूग्णालय येथे असलेल्या सर्व सुविधा आणि परिपूर्ण टीममुळे रूग्णास उत्तमोत्तम आरोग्य सेवा आणि उपचार देणे शक्य असल्याचेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

खारघरचे मेडिकव्हर हॉस्पिटल रुग्णांना चोवीस तास उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी आणि यशस्वी उपचाराकरिता ओळखले जाते. आम्ही प्रत्येक रुग्णाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो. आम्हाला विश्‍वास आहे की या ठिकाणी कार्यरत असलेला यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग सर्वच यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराशी लढणार्‍या रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरेल, अशी प्रतिक्रिया डॉ. नवीन के एन, केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी व्यक्त केली. या शस्त्रक्रियेत डॉ. हार्दिक पहारी, डॉ. अमृता राज, डॉ. अमेय सोनावणे आणि डॉ. अमरीन सांवत आणि डॉ. जयश्री व्ही यांचा सहभाग होता.

Exit mobile version