। मुरूड । प्रतिनिधी ।
सालाबादप्रमाणे यावर्षीही कस्टम पॉईंट (वे.सो.) तर्फे प्रभादेवी येथे सायकल मास्टर 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे 42 वे वर्ष आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. सर्व बनावटीच्या साध्या सायकलींना स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धा पाच गटात खेळवली जाणार आहे.
दरम्यान, या सायकल स्पर्धेसाठी दोन कि.मी.चे अंतर असणार आहे. स्पर्धा प्रभादेवी मंदिर येथून सुरू होणार आहे. पुढे न्यू प्रभादेवी रोड, आप्पासाहेब मराठे मार्ग ते सेंचुरी बाजार पोलीस चौकी, वीर सावरकर मार्ग, साने गुरुजी उद्यान, रवींद्र नाट्य मंदिर आप्पासाहेब मराठे मार्ग अशी मार्गस्थ होऊन पुन्हा प्रभादेवी मंदिर याठिकाणी समाप्त होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्याला एक लाख रुपये रोख, सायकल, ट्रॉफी, पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 200 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रवेश पत्रिका प्रभादेवी मंदिरासमोर, न्यू प्रभादेवी रोड, मुंबई- 400025 याठिकाणी मिळतील. प्रवेशिका मिळण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट रोजी सात ते दहा वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी 9821429297, 9220376141, 9769047972 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.