नागांवमध्ये थरारक सामन्यांनी रंगला ‘शानदार शनिवार’

। अलिबाग । संतोष राऊळ ।
भव्यदिव्य आयोजन, स्वच्छ परिसर, खेळाडूंची राहण्या-जेवणाची उत्तम व्यवस्था, खेळाडूंचा उत्साह, उत्कृष्ट नियोजन, कबड्डी-कबड्डीचा दम, क्रीडा रसिक आणि खेळाडूंनी गजबजलेले मैदान आणि कॅमेर्‍यात कैद करावे वाटणारे खेळातील अभूतपूर्व क्षण….हे सारे चित्र नागावमधील संचालक मंडळ हायस्कूलच्या पटांगणात अनुभवायला मिळाले. निमित्त होते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निखिल मयेकर मित्रमंडळ नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ गट (पुरुष व महिला) रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे. एकापेक्षा एक अशा थरारक सामन्यांनी कबड्डीप्रेमींसाठी हा शानदार शनिवार ठरला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, सुरेंद्र म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नागाव ग्रा.पं. माजी सरपंच नंदकुमार मयेकर, नागाव ग्रा.पं. सरपंच निखिल मयेकर तसेच नृत्यदिग्दर्शिका पूर्वा खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाच दिवसीय या स्पर्धेत पुरुषांचे 256, तर महिलांचे 16 संघ सहभागी होणार असून, 272 सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील खळाडूंची कामगिरी पाहून रायगड जिल्हा पुरूष कबड्डी संघ निवडण्यात येईल. हा संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल. रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून संभाव्य 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबिरानंतर पुरुषांच्या आणि महिलांच्या अंतिम 12 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निखिल मयेकर मित्रमंडळ मेहनत घेत आहेत. यासाठी सर्व स्तरांवरून सरपंच निखिल मयेकर व मित्र मंडळ यांचे कौतुक केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पिंपळे व संदीप जगे यांनी केले.

अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्याकडून कौतुक
रायगड कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी कबड्डीसारखा झाकोळलेला खेळ जिवंत ठेवल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानले. तसेच नागाव येथे भव्यदिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल सरपंच निखिल मयेकर आणि मित्र मंडळ यांचे आभार मानले. कबड्डी निवड चाचणीत सहभागी झालेल्या संघाना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

कबड्डी हा खेळ मूळ आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. कालपर्यंत हा खेळ उपेक्षित होता. मात्र क्रिकेट प्रीमियर लीगप्रमाणे कबड्डी प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हा सर्वसामान्यांचा आणि सर्वांना परवडण्यासारखा खेळ आहे. आज या खेळामुळे अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. भविष्यात हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सुधा खेळवला जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केले आहे. पहिल्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले. त्याचे नेतृत्व कोकणचा सुपुत्र अशोक शिंदे यांनी केले होते. तो अभिमान आजही उराशी बाळगला आहे. आपली प्रतिष्ठा ही राष्ट्रीय तसेच आशिया आणि ऑलिम्पिक स्तरावरही मिळवायची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री
Exit mobile version