। वावोशी । वार्ताहर ।
महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी आपल्या घराच्या परिसरातच गृहउद्योग सुरू करावा, या उद्देशाने वैष्णवी इंटरप्रायजेसच्या मुख्याधिकारी आणि आत्करगावच्या माजी उपसरपंच मालती गायकवाड यांनी खोपोली संगम हॉल येथे महिलांसाठी मोफत गृहउद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरना गृहउद्योगाच्या प्रमुख समीक्षा जाधव उपस्थित होत्या.
समीक्षा जाधव यांनी उपस्थित महिलांना उद्योग संधींची निवड, बाजारपेठ सर्वेक्षण, विपणन व्यवस्था आणि व्यवसाय व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्या स्वतः मसाल्याचे पदार्थ, बेकरी उत्पादने, चिक्की, भाजी, कापूर आणि अत्तर यासारख्या गृहउद्योगांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी यशस्वीपणे उत्पादनांपासून विक्रीपर्यंत सर्व प्रक्रिया हाताळण्याचा अनुभव उपस्थित महिलांशी शेअर केला. समीक्षा जाधव यांनी ग्रामीण महिलांनी आपल्या आवडीचे उत्पादने विक्रीसाठी पुढे आणावीत आणि त्यासाठी आरना गृहउद्योग त्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले. खोपोली आणि खालापूर तालुक्यातील अनेक महिलांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.