| खोपोली | प्रतिनिधी |
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, कर्जत विधानसभा मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी खासदार सुनील तटकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. खालापूर आणि कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची सुतारवाडीत बैठक घेतल्यानंतर मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी खालापूर तालुका आणि खोपोली शहराच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, खासदार तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.
कर्जत विधानसभा मतदार संघातील खोपोली आणि माथेरान नगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूलही लवकरच वाजण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुका जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. बुधवारी खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथील आपल्या निवासस्थानी कर्जत, खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीला प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील, कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, सुरेश पाटील, खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, तानाजी चव्हाण, सुधाकर घारे, शरद लाड, तुकाराम साबळे, संतोष बैलमारे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.