कृषी संजीवनी सप्ताह मेळाव्याचे आयोजन

कार्यक्रमांत विविध योजनांची माहिती

| नेरळ | वार्ताहर |

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि त्याआधी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची सुपीकता शाबूत ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्य कृषी विभागाच्या संगणक उप संचालक यशवंत केंजळे यांनी कर्जत येथील बीड गावामध्ये कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते तेव्हा ते बोलत होते.

त्यावेळी स्थानिक सरपंच प्रभावती लोभी तसेच विभागीय कृषी अधिकारी फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, तालुका मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी विभागीय अधिकारी फुलसुंदर यांनी शेतकऱ्यांनी विविध प्रकारची फळझाडे यांची लागवड करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तर तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी पंतप्रधान किसान योजना आणि कृषी विमा याबद्दल माहिती देवून शेतकऱ्यांनी यासाठी भाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

कृषी पर्यवेक्षक मंगेश गलांडे, सुदर्शन वायसे यांनी वेगवेगळा योजनांची माहिती दिली. या प्रसंगी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सरबत प्रक्रिया करणारे नेरळ येथील उद्योजक क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना एमआरईजीएस अंतर्गत लाभार्थी यांना आंबा कलम यांचे वाटप करण्यात आले. तसेच भाजीपाल्याचे मिनी किट याचे देखील वाटप करण्यात आले. कृषी संजीवनी सप्ताह यशस्वी होण्यासाठी तालुका मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कृषी सहायक श्रद्धा देवकर यांनी नियोजन केले होते.

Exit mobile version