आज बागमळा येथे भजनांचे आयोजन
। चौल । प्रतिनिधी ।
नवरात्रौत्सवानिमित बागमळा येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जागर सुरू आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी (दि.6) दुपारी दोन वाजता याठिकाणी डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनंत लक्ष्मण घरत यांनी दिली.
बागमळा येथील महालक्ष्मी एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी असा महालक्ष्मीचा महिला असून, तिच्यावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. नवरात्र, मार्गशीर्ष महिन्यासह अन्य दिवशीही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कायम गर्दी असते. चौलमळा येथील अनंत घरत हे आई महालक्ष्मीचे निस्सीम भक्त असून, त्यांची देवीवर अपार श्रद्धा आहे. दरवर्षी देवीच्या मंदिरात डबलबारी भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन ते नवरात्रौत्सवाला रंगत आणत असतात. यावर्षीसुद्धा डबलबारी भजनांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत.
जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वाडगाव बुवा नरेश महादेव कडू (गुरुवर्य हरिश्चंद्र लोणारकर यांचे शिष्य) यांना पखवाजावर ओंकार म्हात्रे थळ-डोंगरी हे साथसंगत करणार आहेत. जयेंद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची परंपरा अखंडित सुरू आहे. तर, श्री काळभैरव प्रासादिक भजन मंडळ, वरंडे बुवा महेश पाटील (गुरुवर्य विजयकुमार काळे यांचे शिष्य) यांना मृदुंगमणी म्हणून महेश ठाकूर, तबला ज्ञानेश्वर कदम साथ करणार आहेत. या मंडळाची धुरा अध्यक्ष महेंद्र पाटील समर्थपणे पार पाडत आहेत. दरम्यान, डबलबारी भजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागमळा, चौलमळा मित्रमंडळ मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत पाटील यांनी केले आहे.
