महिला बचतगटांसाठी विक्री – प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन

। रायगड । खास प्रतिनिधी ।

महिला बचतगटांना रोजगाराचे साधन खुले व्हावे, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेत अलिबाग शहरातील कुंटे बाग येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बचतगटांसाठी विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी बुधवारी (दि.13) महोत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून महिला बचतगट स्थापन करण्यात येतात. बचतगटातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी साह्य करण्यात येते. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी विविध ठिकाणी महोत्सव भरविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणेशोत्सव निमित्त विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूह, यशदा महिला स्वयंसहायता समूह, नवोदय महिला स्वयंसहायता समूह, तेजोमय महिला स्वयंसहायता समूह, देविका महिला स्वयंसहायता समूहाने स्टॉल लावले आहेत. स्टॉलवर गणपती मूर्तीचे पूजन करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य, प्रसादासाठी आवश्यक पदार्थ, गणपती मूर्तीसाठी लागणारे अलंकार, सजावटीचे साहित्य तसेच महिलांसाठी उपयुक्त अलंकार, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version