। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज येथे महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले की, सध्याचा काळ हा धकाधकीचा काळ असून इथे वेळेला खूप प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक गोष्टीला वेळेची किंमत समजली आणि वेळेचा अपव्यय टाळला तर प्रत्येक जण हा जीवनात निश्चितपणे यशस्वी होईल, असा आत्मविश्वास या प्रसंगी घारे यांनी व्यक्त केला.
तसेच, या युवा संवाद मेळाव्यानिमित्त पुढील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी वय अधिवास उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर इत्यादी दाखले त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार यांनी विशेष सी.एस.सी. सेंटरची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे इ. दहावी आणि बारावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि इतर विविध क्षेत्रात प्रवेशासाठी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार घारे यांनी अधिक मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार समीर घारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याला एम.ए. शेख, देशमुख, सलीम शहा, तलाठी स्वप्नील मांदळे, सुजित काते, सिकंदर आकलेकर, नेताजी गायकवाड, मुलांन आणि सुमारे 500 विद्यार्थी उपस्थित होते.