पनवेलमध्ये पक्षी सप्ताहाचे आयोजन

| पनवेल | वार्ताहर |

सर्वसामान्यजनांना चिमणी, कावळा, कबूतर, पोपट, साळुंकी एवढेच पक्षी माहीत असतात, पण आपल्या अवतीभवती विविध प्रकारचे, रंगाचे, जातीचे पक्षी वावरत असतात. मुलांना आणि मोठ्यांनाही या पक्षीजगताची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस ते पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचा जन्मदिवस हा सप्ताह निसर्गप्रेमी आणि पक्षीमित्रांतर्फे ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहानिमित्त पनवेलमधील अनुभूती या संस्थेने पनवेल येथील बल्लाळेश्वर तलाव जवळ पक्षी निरीक्षण आणि जागरूकता सत्राचे आयोजन केले होते.

या सत्रात पक्षीतज्ज्ञ सुदीप आठवले यांनी उपस्थित लहान-मोठ्यांना दुर्बिणीद्वारे तलावातील दूरचे पक्षी दाखवून त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. यात त्यांनी पांढऱ्या छातीचा खंड्या, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी, कमळपक्षी, हळदकुंकू बदक, वटवट्या इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची ओळख तसेच त्यांचा अधिवास, त्यांचं अन्न, त्यांचे लाईफ सायकल इत्यादी माहिती सांगितली. लहान मुलांना तर पक्ष्यांबद्दल बरीच उत्सुकता होती आणि सुदीप यांनी त्यांना समग्र माहिती पुरवून त्यांचे समेाधानही केले. पनवेल शहराचे वैभव असलेल्या आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाची जैवविविधता टिकवून ठेवणे हे जसे पनवेल महानगरपालिकेचे कर्तव्य आहे तसेच पनवेलच्या नागरिकांचे सुध्दा, अशी भावना यानिमित्त आलेल्या नागरिकांनी बोलून दाखवली.

Exit mobile version