| रत्नागिरी | प्रतिनिधी |
एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणे आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागृता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘इग्नाईट महाराष्ट्र’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.31) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले की, इग्नाईट 2024 सारख्या कार्यशाळेतून उद्योजकांना विविध विभागांची चांगली माहिती मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून बँकर्स, विविध विभागांचे प्रतिनिधी, उद्योजक यांचा या निमित्ताने चांगला संवाद घडून येणार आहे. सीएमईजीपी, पीएमईजीपी सारख्या योजनांचे आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम सुरु आहे. जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एमएसईएमईमध्ये आपल्या जिल्ह्यात 52 हजार उद्योग सुरु आहेत. यामाध्यमातून देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचा मोठा सहभाग ठरत आहे. टुरिस्ट हाऊसबोट सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील महिलांना केरळ येथे अभ्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचबरोबर 20 महिलांना केरळ येथे काथ्या उद्योगासाठी पाठविण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच 5 टुरिस्ट बोट सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उद्योग विभागाच्या सहसंचालक विजु शिरसाट, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, मैत्रीचे समन्वय अधिकारी किशोर गिरोल्ला, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑरगनायझेशनच्या रिशु मिश्रा, सीडीबीचे मनोज डिंगरा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.






