कैद्यांसाठी कविता डॉट कॉमचे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने तळोजा कारागृहात कैद्यांसाठी बंदिवान बांधवांसाठी कविता डॉट कॉम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अन्वय प्रतिष्ठानचे डॉ.अजित मगदूम यांच्या माध्यमातून कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आई, बाप, भाऊ ते विठोबा, तुकोबा आणि शिवबा यांच्या कविता सादर करण्यात आल्या. दुसर्‍या फेरीत काही प्रेम कविता, गझल, सामाजिक आशयपर कविता घेऊन कवी जितेंद्र लाड, वैभव वर्हाडी, शंकर गोपाळे, रुद्राक्ष पातारे, प्रा.रविंद्र पाटील आणि निवेदक नारायण पाटील यांनी आत्मचिंतन करायला प्रेरित केले. कविता डॉट कॉम परिवाराकडून भावनेला साद देत माणुसकीची दाद देण्यात आली. प्रत्येकजण चुकीला पात्र असतो. मात्र, चुकीची घोडचूक होऊ नये. जीवन सुंदर आहे. कारागृहातच गीता रहस्य, डिस्कवरी ऑफ इंडिया, श्यामची आई या ग्रंथांचा उगम आहे. म्हणजे जीवन संगम कालचे जीवन, आजचा दिवस आणि येणार्‍या उद्यामधून त्रिवेणी संगम बनून जीवन गंगा पवित्र होऊ शकते. याचा प्रत्यय सर्व बंदिवानांना कविता ऐकून आला.

औपचारिक बोलताना अधीक्षक पवार यांनी आपण नेहमीच सकस आणि वर्तन परिवर्तन करणार्‍या उपक्रमास पाठींबा देत, तुरुंगातील बंदिंसाठी घराची आठवण कमी व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. अधीक्षक पवार, झुटाळे, शिंदे, महादेव पवार यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Exit mobile version