| अलिबाग | प्रतिनिधी |
कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मुरुडमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. बुधवारी (दि.7) सायंकाळी चार ते सात यावेळेत हा सोहळा हिंदू एज्युकेशन सोसायटी, विश्रामबागेसमोर रंगणार आहे. या सोहळ्याला सोनी मराठी वाहिनीवरील ‘राणी मी होणार’ या मालिकेतील मिरा म्हणजे अभिनेत्री संचिता कुलकर्णी, अभिनेता मल्हार म्हणजेच सिद्धार्थ खिरीद आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतील शिवाली परब यांची उपस्थिती असणार आहे.
महिला सशक्तीकरणासाठी गेली अनेक वर्षे कृषीवल हळदीकुंकू समारंभ आयोजित करीत आहे. या कार्यक्रमाला सर्व स्तरातील महिलांशी संवाद साधण्याबरोबरच विचारांचे अदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने वर्षोनुवर्षे असलेली ही परंपरा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजला जाणारा हळदीकुंकू समारंभ बुधवारी (दि.7) सायंकाळी चार ते सात यावेळेत साजरा होणार आहे. हळदीकुंकू लावून, औक्षण करून महिलांना सौभाग्याचे वाण यावेळी दिले जाणार आहे. तसेच, खास महिलांसाठी इतर स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाला सिनेतारका वेगळे आकर्षण ठरणार असून, सूत्रसंचालन ऋग्वेद फडके करणार आहे.
जिल्ह्यातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.