जिल्ह्यात महास्वच्छता अभियानाचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातंर्गत जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत गावागावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत बुधवारी (दि.17) रामनाथ-अलिबाग येथील श्रीराम मंदिर परिसरात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हे अभियान 22 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी महादेव केळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

रायगड जिल्ह्यात महास्वच्छता अभियान अंतर्गत मंदिर व तीर्थक्षेत्र, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे, समुद्र किनारे, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, समाजमंदिरे, रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या अभियानात सनाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

स्वच्छता अभियानासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. स्वच्छता मोहिमेसाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य परिवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Exit mobile version