पनवेलमध्ये निनादले देशभक्तीचे सूर

‘ऐ वतन तेरे लिये’ संगीत मैफिलीत पनवेलकर मंत्रमुग्ध

| पनवेल | वार्ताहर |

महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कार्यक्षेत्रात ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मंगळवारी (दि.13 एप्रिल) ‘देवकी मीडिया’ प्रस्तुत ‘ऐ वतन तेरे लिये- संगीत की शाम, देश के नाम’ या बहारदार देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त संतोष राजळे , मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, मुख्य लेखापरिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खर्गे, पाणीपुरवठा अभियंता विलास चव्हाण, प्रकाश गायकवाड, राजेश डोंगरे आदींसह अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पनवेल महापालिकेच्यावतीने कार्यक्रमाचे संगीत संयोजक साहिल रेळेकर यांचे स्वागत करून कार्यक्रमासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात झी सारेगमप फेम गायिका मिथिला माळी, सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका अमृता दहीवलकर, शिरीष कांबळे व सतिष भानुशाली यांनी बहारदार देशभक्तीपर गीते सादर केली. तर निवेदक आर जे अमित काकडे यांनी आपल्या खास शैलीतून भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास उलगडताना प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमात नामवंत वादक विकी आढाव, साहिल रेळेकर, आशिष महाडीक, अभिषेक तिरलोटकर, जयंता बगाडे, अभिषेक नांदगावकर, नितीन भगत, रमेश काळे यांची उत्तम साथ लाभली. तर ध्वनी संयोजन अनिल चौधरी, व्हिज्युअल्स आणि ग्राफिक्स डिझायनर जितेंद्र वागधरे, प्रकाशयोजना राजू तांबे यांनी केली.

‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू’ या गीताने कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. त्यानंतर देस रंगीला, सैनिक हो तुमच्यासाठी, आय लव्ह माय इंडिया, नन्हा मुन्ना राही हू, तेरी मिट्टी मे मिल जावा, मेरा कर्मा तू, संदेसे आते है, ऐ मेरे वतन के लोगो, जिंदगी मौत ना बन जाये, चक दे इंडिया, सुनो गौर से दुनिया वालो अशा अनेकोत्तम देशभक्तीपर गीते सादर झाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शूर आम्ही सरदार, म्यानातून उसळे, शतकांच्या यज्ञातून उठली या गीतांनीही प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या गीताने करण्यात आली. यावेळी पनवेलसह परिसरातील रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. टाळ्यांच्या गजरात रसिकांनी कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

Exit mobile version