20 ऑक्टोबरला 200 साकलस्वारांचा सहभाग
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
सायकलिस्ट क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (दि. 20) करण्यात आले आहे. भाट्ये ते गावखडी व परत भाट्ये या मार्गावर स्पर्धा होणार आहे. देशाच्या विविध भागांतून दोनशे सायकलिस्ट सहभागी होत आहेत. पेडल फॉर बायोडायवर्सिटी अशी संकल्पना या स्पर्धेची असून कोकण कनेक्ट मुव्हमेंटची सुरुवात होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्वीप या कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक या स्पर्धेसाठी सुवर्णसूर्य फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, भारत निवडणूक आयोग, जय हनुमान मित्रमंडळ, दीपक पवार यांच्याकडून विशेष मार्गदर्शन, सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते सुस्थितीत ठेवण्याकरिता विशेष लक्ष दिले आहे. मार्गावरील सर्व ग्रामपंचायती व शाळांनी महत्वाचे सहकार्य केले आहे. रत्नागिरीकरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून यावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. 5 जानेवारीला सलग दुसर्या वर्षी रत्नागिरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन व मार्चमध्ये अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. रत्नागिरीमध्ये पर्यटन वाढले पाहिजे याकरिता ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे. हॉटेल विवेक येथे स्पर्धेबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. त्या वेळी एसआर दर्शन जाधव, एसआर विनायक पावसकर, एसआर महेश सावंत, एसआर डॉ. नितीन सनगर, प्रसाद देवस्थळी, अॅड. सचिन नाचणकर, एसआर डॉ. राज कवडे, एसआर ओंकार फडके, योगेश मोरे उपस्थित होते.
सायकल स्पर्धा सकाळी 6.30 वा. भाट्ये येथून सुरू होणार आहे. कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने भाट्ये येथे स्पर्धा संपेल. सुमारे 48 किलोमीटरचे हे अंतर असून, यात राज्यभरातून नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पुरुष, महिलांचे वेगवेगळे गट केले असून यामध्ये जवळपास 1 लाख 10 हजारांची बक्षिसे, ट्रॉफी देण्यात येतील. जे सायकलिस्ट सायक्लोथॉन पूर्ण करतील त्यांना आकर्षक फिनिशर मेडल देऊन कौतुक करण्यात येणार आहे.