कोमसाप तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

कोमसाप संस्थापक अध्यक्ष मधुभाई मंगेश कर्णिक आणि कोमसाप जनसंपर्क अधिकारी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील यांच्या आशीर्वादाने कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण (मधुबन कट्टा) तर्फे दर महिन्याच्या 17 तारखेला मधुबन कट्टा विमला तलाव उरण शहर येथे कविसंमेलन संपन्न होत असते. येत्या 17 फेब्रुवारी 2024 ला 100 वे कविसंमेलन संपन्न होणार आहे. 100 व्या कविसंमेलना निमित्त दि.17 व 18 फेब्रुवारी रोजी उरण कोमसाप (मधुबन कट्टा )तर्फे एस एस पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण येथे राज्यस्तरीय भव्य काव्य स्पर्धा 2024 चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी 100 कवी मधून 20 कवी बक्षीस पात्र ठरणार आहेत. एकूण बक्षीसांची रक्कम 75000 रुपये असणार आहे.

या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक 25000, व्दितीय 13000, तृतीय 8000, चतुर्थ 5000 तर उत्तेजनार्थ 4000 रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. याशिवाय सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देखील असणार आहे. तसेच, राज्यस्तरीय काव्य स्पर्धे अंतर्गत विभागीय काव्यस्पर्धा देखील होणार आहे. या मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला भगिनी कवयित्रींचा गट, रायगड जिल्हा पुरूष कविबंधू गट आणि रायगड जिल्हा वगळून महाराष्ट्र राज्य पुरूष कवीबंधू गट असे तीन गट असून या तीन गटांना स्वतंत्र बक्षीसे ठेवली आहेत.

या स्पर्धेत निवड फेरीत दर्जेदार कविता पाठवण्याचे आवाहन उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले असून निवड फेरीसाठी कविता पाठवण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी आहे. निवड फेरीत कविता पाठवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 9819652951 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version