माथेरानमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

। नेरळ । प्रतिनिधी ।
कोरोनामुळे माथेरान पूर्णतः बंद होते. पण मागील चार महिन्यांपासून माथेरान हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. माथेरानचे पर्यटन वाढावे यासाठी मुंबई व पुणे येथील रनबडीज या संस्थेने माथेरानमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करून निसर्ग संवर्धनासाठी पर्यटक एकत्र येऊन धावले.
देशातील विविध भागातील 200 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. हे सर्व स्पर्धक भारताच्या विविध राज्यातून आले होते. यामध्ये महिला व पुरुष सहभागी झाले होते. 10 किमी, 25 किमी, 35 किमी व 50 किलोमीटर असे चार टप्यात ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये 10 किमी पुरुष गटात मध्ये वैभव रामतीर्थे तर 45 वयोगटावरील स्पर्धेत बिरज जगताप, महिलांमध्ये रिचा पारेख व वरिष्ठ गटातील हेन्रीजेत्ता नायक, 25 किमी पुरुष गटात अनिल कोर्वी वरिष्ठ गटात चार्ल्स टेंज, महिला गटात वर्षा थेटे वरिष्ठ गटात पूजा वर्मा, 35 किमी गटात प्रदीप पाटील, वरिष्ठ गटात संदेश जाधव, महिला गटात विजयाभारती भट आणि 50 किमी पुंरुष गटात सिद्धेश भिडे व वरिष्ठ गटात आशिष पुणतांबेकर हे प्रथम आले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माथेरान मधील एका हॉटेलमध्ये घेण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे संचालक अरविंद बिचवे यांनी सांगितले की, ही स्पर्धा कोरोना नंतर प्रथमच माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी व निसर्ग संवर्धनासाठी घेतली. या स्पर्धेमुळे माथेरान मधील माल वाहणार्‍या कुली पासून रेस्टॉरंट, पॉइंटचे दुकानदार व हॉटेलवाले यांना रोजगार मिळाला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून स्पर्धक आल्याने पर्यटनवाढीसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक हृतिक रोशन यांची एचआरएक्स ही होती. या स्पर्धेत 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. कोव्हिड-19 चे सर्व नियम पाळून ही स्पर्धा घेण्यात आली. ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत त्यांनाच या मॅरेथॉनमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

Exit mobile version