पुनर्वसनासंदर्भात बैठकीचे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने पनवेलच्या पारगाव-डुंगी गावांच्या पुनर्वसनासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.5 मे रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकार्यालयात बैठक लावण्यात आली असून ही बैठक लावावी म्हणून पारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच निशा रत्नदीप पाटील,समाजसेवक बाळासाहेब नाईक,माजी उपसरपंच मनोज राम दळवी तसेच सुहास पाटील,सदाशिव पाटील यांनी नामदार जयंत पाटील यांना निवेदन दिले होते. ग्रुप ग्रामपंचायत पारगाव हद्दीलगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या दगड-मातीचा भरावामुळे गेली अनेक वर्ष पावसाळ्यात चार ते पाच वेळा पुरस्थिती निर्माण होते. पावसाच्या पाण्यामुळे पारगाव-डुंगी गावातील रहिवाशांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे नुकसान होऊन अतोनात हाल झाले होते.डुंगी गावातील रहिवाशांना 4 महिन्याकरता पावसाळ्यात सिडकोच्या माध्यमातून घरभाडे दिले जाते परंतु मौजे पारगाव गावातील जवळजवळ 90 ते 100 घरात पाणी जाऊन त्यांचे नुकसान होत असून देखील पारगाव गावाकरता सिडकोतर्फे कोणत्याही प्रकारचे घरभाडे मोबदला दिला जात नाही.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाबाबत सुरू असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे पारगाव व डुंगी गावात पावसात पुरस्थिती होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारगाव-डुंगी गावचे पुनर्वसन होऊन या कामी न्याय मिळवून देण्याकरीता सदर जिल्हाधिकारी कार्यालय या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version