। रायगड । वार्ताहर ।
29 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस राजदेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सचिव अमोल शिंदे यांनी केले आहे.
न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी मामजस्यांतून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीद्रारे निकाली काढली आहेत. लोक अदालतीमध्ये तडजोडीदार निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रस्तावित प्रकरणातील पक्षकार याच्यासोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोक अदालतीचे यश लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरिता विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत केले आहे.
प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी पहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांच्याकरिता आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकारिता ही एक सुवर्णसंधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे.