काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने युवकांमध्ये राजकीय जागरूकता, संघटनात्मक कौशल्ये व संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने युवा कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवारी (दि. 28) व रविवारी (दि. 29) अलिबागमधील रविकिरण हॉटेलमधील सभागृहात होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार डॉ. रामहरी रूपनवर, प्रा.यशराज पारखी पाटील, सचिन सावंत प्रवक्ते हे युवकांशी संवाद साधून प्रशिक्षण सत्रात मौलिक विचार मांडणार आहेत. या दोन दिवसीय शिबिरात युवक कार्यकर्त्यांना संविधान, पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर, अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व अनुभवी नेत्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील युवा काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील संघटनाला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे, अशी माहिती काँग्रेस कमिटी अलिबाग तालुक्याचे माजी अध्यक्ष योगेश मगर यांनी दिली आहे.
विचार, दिशा देणारे शिबीर ठरणार
युवा कार्यकर्त्यांसाठी दोन दिवस प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी मजबूत व सजग युवा कार्यकर्त्यांची गरज आहे. हे शिबीर कार्यकर्त्यांना विचार, चैतन्य व दिशा देईल, असा विश्वास रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे.
