शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |

श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय येथे शीख धर्माचे नववे गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहादत दिनानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सहिष्णुता व बलिदानाची भावना जागृत व्हावी, हा या कार्यक्रमामागील उद्देश होता. शासनाच्या शिक्षण विभागाकडून हा कार्यक्रम साजरा करून शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने 350 व्या शहादत दिन प्रत्येक शाळेत विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेत चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच वाचन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर आधारित सुंदर चित्रे साकारली व प्रश्नमंजुषेद्वारे आपले ज्ञान प्रदर्शित केले. तसेच गुरु तेग बहादुर कोण होते व त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेसाठी केलेले महान बलिदान याविषयी माहितीपट दाखविण्यात आला. त्यांच्या कार्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा व सर्वधर्मसमभावाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अर्चना खोत, पर्यवेक्षक प्रतिक पेडणेकर तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन त्यांच्या विचारांचे महत्त्व समजले.

Exit mobile version