गीत गायन स्पर्धेचे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शनिवारी (दि.20) सकाळी संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पखवाज वादन व तबला वादन विद्यार्थी व शिक्षकांनी केले. या स्पर्धेसाठी अभंग, भक्ती गीते, सुगम संगीत व भावगीते असे विषय देण्यात आले होते. एकापेक्षा एक सरस आणि सुरस गाण्यांनी सारे वातावरण भक्तिमय झाले होते.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली गावित यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक सुनील धुमाळ व अर्जुन ठाकूर लाभले होते. या स्पर्धेचे नियोजन कलाशिक्षक पी .आर. नेरुरकर, स्पर्धा समिती प्रमुख प्रकाश भगत, रेश्मा गावंड, स्नेहा पाटील, मिलिंद भगत व कीर्तीदा शेळके यांनी केले. या स्पर्धेचे निवेदन कीर्तीदा संदीप शेळके यांनी व आभार प्रदर्शन प्रकाश भगत यांनी केले.

Exit mobile version