माथेरानमधील अन्य रोजगार ई-रिक्षाने बुडणार नाही

सुकाणू समिती घेणार निर्णय

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमधील ई-रिक्षा व्यवसायाने अन्य कोणत्याही घटकांचा हातचा व्यवसाय जाणार नाही, याचा विचार करण्यासाठी एक सुकाणू समिती गठीत करण्याचा निर्णय येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ई-रिक्षाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन माथेरान मधील व्यापारी संघटना, रिक्षा संघटना यांनी आ. महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार सर्व थरातील व्यक्ती आणि व्यावसायिक यांची बैठक घेतली. त्या बैठकीत ई-रिक्षा बाबत सकारात्मक चर्चा झाली. कोणत्याही व्यक्तीचा व्यवसाय हातातून जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

येथील कम्युनिटी सेंटर मध्ये माथेरान मधील व्यापारी, हात रिक्षा चालक, अश्‍वपाल संघटना, राजकीय व्यक्ती आणि नागरिक यांची बैठक घेतली. बैठकीला माथेरान नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेख भणगे, माथेरानचे महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पोलीस अधिकारी शेखर लव्हे आदी उपस्थित होते. या बैठकीत.अनेक नागरिकांनी ई-रिक्षा हवी अशी भूमिका मांडली. तर ई-रीक्षा आल्यास कुली आणि घोडे व्यवसायावर परिणाम होईल, असे अश्‍वपालकानी आपले मत मांडले आणि लेखी निवेदन ही दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, चंद्रकांत चौधरी यांनी मते मांडली. या बैठकीत ग्रामस्थ नागरिक आणि अन्य सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यांनंतर थोरवे यांनी आपल्या भाषणात माथेरानच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. माथेरानचे पर्यटन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करेन,.हे सरकार सर्व सामान्य जनतेच आहे. कुणाचाही व्यवसाय बदं पडणार नाही. ई-रिक्षा आल्यास माथेरान वनडे पिकनिक स्पॉट होईल. घोडे व्यवसायावर परिणाम होईल ही भीती अनाठायी आहे. कुणाचाही रोजगार बुडणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मी दोन्ही बाजू ऐकुन घेतल्या आहेत. सर्वाना व्यवसाय मिळेल, कुणाचीही चुल बंद पडणार नाही. असा समाधानकारक मार्ग काढला जाईल असे ठोस आश्‍वासन दिले.

Exit mobile version