| पेण | प्रतिनिधी |
सेझ रद्द होऊन बरीच वर्ष झाली आहेत, मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या साताबारावरील सेझचे शिक्के काढलेले नाहीत. सरकारने शेतकऱ्यांचा साताबारा तातडीने कोरा करावा अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करु, असा इशारा शेकाप आमदार जयंत पाटील यांनी दिला. हेटवणे पाणी प्रश्नासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पेण-वाशी येथील जगदंबा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते.
येथील शेतकऱ्यांनी हेटवणे धरणासाठी आपल्या जमीनी दिल्या आहेत. मात्र, त्यांना आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पेणमधील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी विधीमंडळामध्ये सातत्याने आवाज उठवला. त्यानंतर 38 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु हे पैसे कोठे गेले असा सवाल आमदार पाटील यांनी केला. पेण तालुक्यातील शेती टिकली पाहीजे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी हेटवणे प्रकल्पासाठी आपल्या जमीनी दिल्या होत्या. या पाण्याचा लाभ कासूमधील शेतकऱ्यांना मिळणार होता. त्यानंतर उर्वरित पाणी हे अलिबाग तालुक्याला मिळणार होते. मात्र, गेल्या 50 वर्षात हेटवणेचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. हेटवण्याच्या प्रश्नी सरकारचे धोरण चुकीचे आहे. पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण करुन हेटवण्याचा पाणी प्रश्न पुन्हा जिवंत केला आहे. याबाबत सर्वांचे अभिनंदन करतो, असे आमदार पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न पुढील दीड महिन्या सोडवतो असे विधीमंडळात सांगितले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पेण तालुक्यातील 45 गावातील जमीनी महामुंबई सेझमध्ये घेतल्या होत्या. सेझ रद्द होऊन बरीच वर्षे झाली आहेत. सेझ प्रकल्पात घेतलेल्या जमीनी परत शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचे सरकारने वेळोवेळी मान्य केले होते. सरकारने शेतकऱ्यांचे सातबारे कोरे केले नाहीत, तर मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करु असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
या प्रसंगी जाहीर सभेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप नेते सुरेश खैरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महादेव दिवेकर, ॲड. अमित नवले, उपोषणकर्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी वाशी सरपंच संदेश ठाकूर बंड्या पाटील, अनंत पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.