दुधाच्या प्रश्नावर राजू शेट्टी आक्रमक
। अहमदनगर । वृत्तसंस्था ।
उसाच्या भावासाठी सरकार आणि कारखानादारांना धारेवर धरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दुधाच्या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. दूध उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव दुधाला मिळत नाही. येत्या चार दिवसांत सरकारने निर्णय घेऊन दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर द्यावा. अन्यथा सोमवारनंतर राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. वेळ पडली तर मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखला जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
दूध दरासाठी राज्यात सध्या विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलने सुरू आहेत. राहुरी येथील आंदोलनासाठी शेट्टी नगरला आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, दुधातील भेसळ रोखली तरी दुधाला दर मिळेल, पण तशी सरकारची मानसिकता दिसत नाही. केंद्र, राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहेत. कांदा, कापूस, साखरेवर निर्यातबंदी, सोयाबीन पेंड आयात करणे, देशात आणि राज्यात दूध भुकटी शिल्लक असताना आयात करणे, आता तांदळाच्या बाबतीतही असा निर्णय घेत आहेत. सरकार नेमके करतय काय असा प्रश्न पडतोय, कारण सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडणीत सापडून कर्जबाजारी होत आहे. दुधाला दर देण्याएवजी अनुदानाची घोषणा केली जात आहे.
दूध उत्पादक आणि दुधासाठी आंदोलन करणार्यांना वगळून दुग्धविकासमंत्री बैठका घेत आहेत. दूध अनुदान हा केवळ फार्स आहे. दिल्या जाणार्या अनुदानाच्या अटींमुळे बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित राहतील. ज्या राज्यात आतापर्यत दुधाचे धोरणे ठरायचे, त्या राज्यात दुधसंघाच्या सरकारी जागा हडपल्या जात आहेत. महानंदासारखी मदर डेअरी मोडीत काढली आहे. दूध दराचा प्रश्न सरकारला सोडावाच लागेल. चार दिवसात निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी असे अंदोलन करेल की सरकारला निर्णय घ्यायलाच भाग पडेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
सरकार उद्योगपतीचे 14 लाख 50 हजार कोटीचे कर्ज माफ करते. शेतकर्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. पीकविमा योजना म्हणजे कार्पोरेट कंपन्यासाठी कल्याणकारी योजना झाली आहे. विम्यासाठी सरकार कंपन्याला जेवढे पैसे तेवढेच पैसे थेट शेतकर्यांना दिले तरी शेतकर्यांना नुकसान भरपाई पुरेसी होईल. पण शेतकर्यांच्या नावाखाली कोण तिजोरी भरतेय हे पाहणे गरजेचे आहे. पिकविम्याबाबात श्वेतपत्रिका निघाली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी आमदार प्राजक्त जनपुरे, प्रा.संदीप जगताप, रवी मोरे यावेळी उपस्थित होते.