। उरण । प्रतिनिधी ।
उलवे नोडमधील रहिवाशांना पाणी, वीज आणि शाळा प्रवेश अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. परंतु, गेल्या पाच वर्षात येथील रहिवाशांना विद्यमान आमदारांचे दर्शन देखील झालेले नाही. यामुळे येथील नागरीक हैराण झाले आहेत. जनतेच्या या समस्या दूर करण्यासाठी 24 तास जनतेसोबत असणारे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकाप नेते सचीन ताडफळे यांनी केले आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारानिमीत्ताने उलवे नोड येथे मतदारांच्या गाठीभेटी दौर्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना सचीन ताडफळे म्हणाले की, सरकारने लाडकी बहिण योजना आणली, मात्र ही लाडकी बहिण निरोगी व दीर्घायुषी होण्यासाठी काही केले नाही. ते महत्वाचे काम प्रीतम म्हात्रे करीत आहेत. स्त्रीयांची मोफत कर्करोग तपासणी तसेच प्रतिबंधक लस देऊन लाडक्या बहिणीला निरोगी राखण्याचे काम ते करत आहेत. तसेच, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम करणारे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन युवकाचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम ते करीत आहेत. यामुळे जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणार्या या उद्याच्या सुर्याला साथ देण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सचीन ताडफळे यांनी सांगितले.
यावेळी अखिलेश, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, नारायण घरत, जितेंद्र म्हात्रे आदींसह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बहुजन व्यासपीठाचा पाठिंबा
अगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन व्यासपीठाच्यावतीने गजाननराव गवळी यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त व मागासवर्गीय समाजाने निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करून शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.