। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाने ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना सुरू करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. अनेक ठिकाणी हे केंद्र सुरू करताना मोठा गाजावाजा देखील केला गेला. परंतु, आता ‘आपला दवाखाना’च आजारी पडला आहे. दवाखाना सुरू झाल्यापासून याठिकाणी थेंब भर पाणी देखील आलेले नाही. तसेच, पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हा दवाखाना गेली काही महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. तसेच, ज्या डॉक्टरांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती त्या डॉक्टरांनी देखील पळ काढला आहे.
महाडमध्ये मे 2023 मध्ये प्रत्यक्षात आपला दवाखाना सुरु करण्यात आला. तिथपासून साधारण ऑगस्ट 2023पर्यंत हा दवाखाना सुरू होता. त्यानंतर मात्र विविध कारणास्तव हा दवाखानाच आजारी पडत गेला आहे. आज याठिकाणी फक्त दोन ते तीन कर्मचारीच काम करताना दिसत आहेत. महाड शहरामध्ये मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यापासून पाणीच आलेले नाही. पॅथॉलॉजिकल तपासण्यांसठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे कर्मचार्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. तसेच, स्वच्छतागृह वापरताना देखील रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचार्यांची कुचंबना होत आहे. या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळी सुरळीत वीज पुरवठा करण्यात आला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसातच हा विजापुरवठा खंडित झाला आहे. उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी वीज व्यवस्था नसल्याने लॅब तपासणीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तर, दुसरे केंद्र शहरातील काजळपुरा भागात सामाजिक सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन झाले असले तरी काजळपुरा भागातील केंद्र सभागृहाच्या कामासाठी आजपर्यंत सुरू झालेले नाही.