शेकापक्षाचे नेते दि.बा.पाटील त्यावेळी रायगड जिल्हा राजकारणाचे सिंह होते. जाहिरनाम्यावर बोलण्यासाठी सर्व पक्ष प्रमुखांना एका विचारपीठावर या असे दि.बा. पाटील सिंहाने डरकाळी फोडावी अशा थाटात सर्व पक्षांना आव्हान देत. दि.बा.पाटील यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व पक्षांचे प्रमुखही सर्वपक्षीय सभेला येत. अशा सभा मी पाहिल्यात. अशा सभेत शेका पक्षाचे नेते दि.बा.पाटील फायलींचे मोठे गठ्ठे टेबलावर ठेवीत आणि भाषणाला उभे रहात. आमच्या पक्षाने जाहिरनाम्यात कोणती आश्वासने दिली होती आणि त्यातली गेल्या पाच वर्षांत कोणती पूर्ण केली आणि कोणत्या आश्वासनांची पूर्तता का करता आली नाही? याचा हिशोब जनतेसमोर मांडत.
सुधाकर लाड
भाताला भाव मिळालाच पाहिजे ! लाल बावटे की जय !! हा आवाज कुणाचा ? शेतकरी कामगार पक्षाचा !!! झिंदाबाद ! झिंदाबाद !! दि.बा पाटील झिंदाबाद !!! अशा गगनभेदी घोषणा कानावर ल्या की; आम्ही मुलं घरातून बाहेर यायचो आणि घराच्या बाजुला असलेल्या झाडाच्या फांद्यांवर सरसर चढायचो ; हातात लाल बावटा घेतलेल्या शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा निट पाहता यावा म्हणून आम्हां मुलांमधील मोठी मुलं घरासमोरच्या कुसावर उभी रहायची. मीही मोर्चा निट पाहता यावा म्हणून घरासमोरच्या कुसावर जाऊन बसायचो आणि रस्त्यावरून जाणारा मोर्चा मोठ्या उत्सुकतेने पहायचो.
मोर्चाच्या अग्रभागी जंगलातील सिंह जसा जंगलातल्या राजा सारखा ऐटीत, रूबाबात चालतो तशा ऐटीत, रूबाबात चालणारे मोर्चाचे नेते दि.बा. पाटील दिसत. त्यांच्यामागे हातात भला मोठा लालबावटा घेतलेला एक झुपकेदार मिशी असलेला माणूस चालत असे आणि या दोघांच्या मागे हातात लाल बावटे घेतलेल्या शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा चालत असे हे दृष्य आम्ही मुलं खूप उत्सुकतेने आणि जिवाचा आटापीटा करीत पाहायचो.
पनवेल, त्यावेळी एक छोटे गांव होते. दि.बा. पाटील यांचा मोर्चा निघाल्याची बातमी वाऱ्याबरोबर पसरायची आणि त्या बरोबर पनवेलमधील दुकाने, बाजारपेठा धडाधड बंद होत असत. रस्ते निर्मनुष्य होतं, सगळीकडे शांतता पसरे, वातावरणही भीतीदायक होई. सर्वत्र दि.बा. पाटील यांच्या मोर्चाचीच चर्चा सुरू होई. आम्ही शाळकरी मुलांमध्येही या मोर्चाच्या गप्पा सुरू होतं. आमचं सुदैव त्यावेळी दूरदर्शन संच नव्हते त्यामुळे रोज संध्याकाळी आम्ही मुलं क्रिकेट, हुतुतु सारखे खेळ खेळायचो. खेळून झालं की; घरासमोरच्या अंगणात आम्हां मुलांच्या गप्पागोष्टींच्या मैफीली रंगायच्या. त्यावेळी आमचे मोठे भाऊ आम्हांला वेगवेगळ्या विषयांची माहिती सांगत. दि.बा. पाटील यांनी काढलेल्या मोर्चावरही आमच्या गप्पा होत. आम्ही मुलं आमच्या मोठ्या भावांना मनातले प्रश्न विचारायचो. दि.बा. पाटील नेहमी मोर्चे का काढतात? असा प्रश्न आम्हा मुलांना यायचा.
आमच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमचे मोठे भाऊ आम्हां मुलांना अनेक गोष्टी समजावून सांगायचे आणि आम्हांला पुस्तकं वाचायला सांगायचे. माझ्या घरात पुष्कळ पुस्तकं होती. त्यात भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथी भागवत, बायबल या धार्मिक पुस्तकांबरोबर रशियन राज्यक्रांती, कांतिधुरंधर लेनिन, मॅकझीम गोर्कीची जगभरात गाजलेली ‘आई’ ही कादंबरी, मार्क्स एंगल्स यांची कम्युनिझम वरील बरीचशी पुस्तकं होती यातली सहावी -सातवीत असतांनाच मी बरीच पुस्तकं वाचून काढली होती. आम्ही मुलं-मुलं रविवारी सार्वजनिक वाचनालयात जायचो, तिथली गुळगळीत पानांची ‘सोविएत
समाचार’ ची मासिके आवडीने वाचायचो. त्यामुळे रशियातल्या शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी मार्क्स एंगल्सचे कम्युनिझम तत्वज्ञान स्विकारून कॉम्रेड लेनिन स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली 1917 साली झारशाहीची भांडवलदारी सत्ता उलथवून राज्यक्रांती केल्याचा इतिहासत्या वयात वाचनात आला.
रशियात समाजवादी जनतेने क्रांती केल्यावर रशियातील लोकांना प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकिय सेवा, सांस्कृतिक, क्रीडा संस्थानचा विनामुल्य लाभ घेता येतोय. जन्मापासून मरेपर्यंत लोकांच्या शिक्षण, नोकरी, आरोग्याची काळजी सरकार घेतेय. सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देते. तेथील लोक सर्व सुखसोईंनी सुसज्ज अशा घरात राहतात. स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात पुरूषांबरोबर समान अधिकाराचा उपभोग घेत आहेत. रशियातील पोस्ट, रेडिओ, बँका सारख्या सार्वजनिक संस्था, रेल्वे, कारखाने, उद्योगधंदे सर्व लोकांच्या मालकीची आहेत. रशियाने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या या प्रचंड प्रगतीची ही अद्भुतरम्य माहिती वाचनात आली.
रशियातील ही समाजसत्तावादी राज्यव्यवस्था भारतात आणण्यासाठी दि.बा. पाटील यांच्यासारखे शेतकरी कामगार पक्षातील नेते (मासलिडर) संघर्ष करतात, शेतकऱ्यांचे, कामगारांचे मोर्चे काढतात हे त्या वयात मला समजल्यावर माझ्यासारख्या मुलांच्या मनात कम्युनिझम तत्वज्ञान मानणाऱ्या शेकापक्षाबद्दल आणि दि.बा. पाटील यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. दि.बा. पाटील मायासारख्या अनेक मुलांचे ‘हिरो’ होते ! आदर्श होते!
माझ्या लहानपणी नगरपरिषदेच्या निवडणूकीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागल्या की; नगरपरिषदेच्या मैदानावर आणि गावातील अन्य ठिकाणी होणाऱ्या सभांना आम्ही मुलं-मुलं जायचो आणि सभेसाठी उभारलेल्या मंचासमोर मांडी घालून बसायचो. पूर्वी पनवेलमधील काँग्रेस, शेकापक्ष, शिवसेना हे प्रस्तापित पक्ष जाहिरनामे प्रसिध्द करायचे. शेकापक्षाचे नेते दि.बा.पाटील त्यावेळी रायगड जिल्हा राजकारणाचे सिंह होते. जाहिरनाम्यावर बोलण्यासाठी सर्व पक्ष प्रमुखांना एका विचारपीठावर या असे दि.बा. पाटील सिंहाने डरकाळी फोडावी अशा थाटात सर्व पक्षांना आव्हान देत. दि.बा.पाटील यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व पक्षांचे प्रमुखही सर्वपक्षीय सभेला येत. अशा सभा मी पाहिल्यात. अशा सभेत शेका पक्षाचे नेते दि.बा.पाटील फायलींचे मोठे गठ्ठे टेबलावर ठेवीत आणि भाषणाला उभे रहात. आमच्या पक्षाने जाहिरनाम्यात कोणती आश्वासने दिली होती आणि त्यातली गेल्या पाच वर्षांत कोणती पूर्ण केली आणि कोणत्या आश्वासनांची पूर्तता का करता आली नाही? याचा हिशोब जनतेसमोर मांडत. यावेळी दि.बा. पाटील आवेषपूर्ण भाषण करीत. त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच भाषण अतिशय अभ्यासपूर्ण असे. त्यांनी भाषणात मांडलेले मुद्दे विरोधकांना भुईसपाट करीत. शेकापक्षाची बुलंद तोफ असा नावलौकिक असलेले शंकरराव गुळवे, शिवसेनेचे माधवराव भिडे, कुमार भावे, कॉंग्रेसचे कमळाकर ठाकूर, भाजपचे डॉ. प्रभाकर पटवर्धन, जनता दलाचे डॉ. प्रभाकर गांधी ही सर्वपक्षीय नेते मंडळी नगर परिषदेच्या मैदानावर एकमेकांना वैचारिक आव्हाने देत आणि जाहिरनाम्यावर वाक्युध्द करीत. तेव्हा वैश्विक लोकशाहीचं दर्शन होई.
कार्ल मार्क्स, एंगल्स यांच्या विचारांशी बांधिलकी मानणाऱ्या शेकापक्षात त्यावेळी प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यावर जाहिर सभांतून विचार मांडण्याची परंपरा होती. वेगवेगळ्या पक्षांत अशा सभांमुळे त्यावेळी विचारमंथन होत असे आम्हां मुलांना हे विचार ऐकण्याची या सभा म्हणजे मोठी पर्वणी होती. निवडणूकांच्या सभांव्यतिरिक्त वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या सभांतून दि.बा.पाटील सामाजिक
विषमतेवर परखडपणे बोलत. हिंदू धर्मातील चार्तुवर्ण व्यवस्थेवर तर ते नेहमीच कडाडून हल्ला करीत. बहुजन समाजातील समाज पुरूषांचा पुरूषार्थ जागृत करण्यासाठी दि.बा. पाटील अतिशय परखडपणे, स्पष्टपणे, ठामपणे, ठणकावून बोलत. त्यांच्या भाषणातील क्रांतिकारी विचारांत समाजमनाला पेटवून उठवण्याची ताकद होती. सामाजिक अन्याय, अत्याचाराविरोधात स्वत:च्या हक्काची लढाई लढण्यास प्रवृत्त करण्यासाठी दि.बा.पाटील याचे भाषण समाजाला प्रेरणादायक, स्फूर्तीदायक ठरे.
क्रॉप्म्टन ग्रीव्हज लि. (मुंबई) या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून नोकरी करीत असतांना मी रहात असलेल्या परिसरातील छोट्या छोट्या समस्या दैनिक लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रांत पत्राधारे मी लिहित असे. वृत्तपत्रात माझे एखादे पत्र प्रसिध्द झाले की; मला आकाश ठेंगणे वाटत असे. त्याकाळात वृत्तपत्रात पत्राधारे मांडलेल्या समस्यांबाबत संबंधीत लगेच दखल घेत आणि ती समस्या सोडविण्याबाबत कारवाई सुरू होई. पत्राधारे मी वृत्तपत्रात मांडलेल्या अनेक समस्या सुटल्या. वृत्तपत्रात आलेली छोटीशी बातमी मोठे काम करू शकते. या वृत्तपत्राच्या ताकदीची जाणीव मला झाली व मी पत्रकारितेकडे आकर्षित झालो. 87-88 सालात मी पत्रकारितेत आलो तेव्हा माझ्या सुदैवाने पनवेलमध्ये राहणारे काही दिग्गज पत्रकारांचा सहवास मला लाभला. या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून माझे शेकापक्षाचे नेते दि.बा. पाटील यांच्याकडे जाणे होवू लागले. दि.बा. पाटील साहेब तर माझे ‘हिरो’ होते, ‘आदर्श’ होते. दि.बा. पाटील साहेबांच्या एखाद्या कार्यक्रमाची, सभेची बातमी देताना मी ‘कष्टकरी, श्रमजीवी जनतचे हद्यसम्राट दि.बा. पाटील अशी सुरूवात करीत असे.