| कोर्लई | प्रतिनिधी |
उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील,अनियमित, शाळाबाह्य मुलांना शंभर टक्के शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुरुडमध्ये तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तहसीलदार आदेश डफळ यांनी केले.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांना शाळेत दाखल करुन घेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याबाबत व स्थलांतरित होऊन जाणाऱ्या मुलांचे नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीच्या बैठकीला यावेळी समिती अध्यक्ष तथा तहसीलदार आदेश डफळ, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, सुनील पाटील, विश्वनाथ म्हात्रे, चुनेकर, शिंदे, चेतन पाटील, राजेश भोईर, संतोष पुकळे, मिलिंद पालवणकर उपस्थित होते.

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे आरोग्य मान सुधारण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत असून शाळाबाह्य मुलांना कोणतीही उणीव असेल तर स्वतः वैयक्तिक मदत करेन असे तहसीलदार आदेश डफळ यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बाकी आहेत, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशा मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे आणि आरोग्याची जोपासना करणे हे काम प्राधान्याने करण्यात बैठकीत ठरविण्यात आले. प्रास्ताविक सुनील गवळी यांनी तर सुनील पाटील यांनी आभार मानले.







