शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगणार

डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन
| पेण | वार्ताहर |

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे अनेक आदिवासी मुले शाळेच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या अंकुर ट्रस्टद्वारे आयोजित कुमारवयातील आदिवासींच्या शिबिरात बोलत होत्या. यावेळी अंकुर ट्रस्टचे राज पाटील, नॅशनल कॉम्प्युटर सेंटरचे श्री. शेळके, आदिवासी कार्यकर्ते मधुकर लेडी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

अंकुर ट्रस्ट या संस्थेने आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहाय्याने शाळांमध्ये नाव आहे, पण उपस्थिती नाही आणि जे पूर्ण शाळाबाह्य आहेत अशा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून समवयस्क मुली व मुले आपल्या आदिवासीवाड्यांवर काय व कसे कार्य करू शकतात, याबाबत मार्गदर्शनपर सत्र यामध्ये चालविण्यात आले. यामध्ये निर्मला निकेतन या संस्थेच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी दृकश्राव्य माध्यमातून चर्चा घडवून आणली. अंकुर संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांत ऐंशीहून अधिक मुलांना पुन्हा शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे. सदरचे शिबीर हे या अभियानाचा एक भाग असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्या गौरी दळवी यांनी सांगितले.

Exit mobile version